अकोला : अकोला वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या काटेपूर्णा अभयारण्यात शुक्रवारी (५ मे) वैशाख पौर्णिमेच्या धवल चंद्रप्रकाशात राबविण्यात आलेल्या निसर्ग अनुभव उपक्रमास (प्राणी गणना) निसर्गप्रेमी व स्वयंसेवी संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. निसर्ग अनुभव घेणाऱ्या निसर्गप्रेमींना तब्बल ३०९ वन्यप्राणी व पक्ष्यांचे दर्शन झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
बुद्ध पौर्णिमेच्या शुभ्र चंद्रप्रकाशात निसर्गप्रेमींना निसर्ग अनुभव घेता यावा यासाठी वन विभागाकडून काटेपूर्णा येथे ५ मे रोजी प्राणी गणनेचे आयोजन करण्यात आले होते. पाणवठ्यांशेजारी उभारण्यात आलेल्या सात मचानांवर प्रत्येकी एक अशा सात निसर्गप्रेमींची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या सोबतीला वन कर्मचारीही देण्यात आले होते. ऑनलाइन बुकिंग केलेल्या निसर्गप्रेमींना शुक्रवारी सकाळी अभयारण्यात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी वाटप केलेल्या मचानांवर त्यांची व्यवस्था करण्यात आली. निसर्गप्रेमींनी रात्रभर शुभ्र चंद्रप्रकाशात निसर्गाचा अनुभव घेत पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांची नोंद केली. विभागीय वनाधिकारी अनिल निमजे, सहायक वनसंरक्षक वसंत साबळे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या उपक्रमासाठी वन परिक्षेत्र अधिकारी पवन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
या प्राण्यांचे झाले दर्शन
बिबट - ३
चितळ - ८०
सांभर - ५नीलगाय - ६४
चिंकारा - १०सायाळ - २
माकड - ३८रानडुक्कर - ६६
मोर, लांडाेर - २८ससा - १३
वैशाख पौर्णिमेच्या रात्री निसर्ग अनुभव उपक्रमात निसर्गप्रेमींना निरीक्षणादरम्यान ३०९ वन्यप्राणी आढळून आले आहेत. याचा अर्थ अभयारण्यात एवढेच वन्यप्राणी आहेत, असा होत नाही. हा उपक्रम म्हणजे वन्यप्राण्यांची गणना नव्हे. अभयारण्यात यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे.
- पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा अभयारण्य