आताही स्थिती अर्ध्यावरच, एसटीची चाके फसलेलीच
सचिन राऊत, अकोला : कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जागेवरच उभ्या असल्याने अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय कार्यालयांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोला १, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर हे पाच आगार आहेत. या पाच आगारांतून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रोज सुरू असतात. त्यामुळे एका आगाराला दिवसाला सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न आहे; मात्र कोरोनाच्या संकटकाळात शासनाने कडक निर्बंध लावल्यामुळे एसटीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. याच सहा महिन्यांच्या कालावधीत एसटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून आता ही परिस्थिती या स्वरूपात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्य परिवहन महामंडळ या आर्थिक नुकसानीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र ज्या ठिकाणी दिवसाला पाच लाख रुपयांचे उत्पन्न होते त्या ठिकाणी आताच्या काळात दिवसाला केवळ दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटी आताही आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मालवाहतुकीचा हातभार
कोरोनाच्या संकटकाळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने त्यांनी थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून तातडीने मालवाहतूक सेवा सुरू केली. एसटीला या संकटकाळात मालवाहतुकीचा मोठा हातभार लागला. मालवाहतुकीमुळे एसटीला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी खारीचा हातभार उचलण्यास मदत केली. मालवाहतूकीतून आताही एसटीला बऱ्याच प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.
१८० दिवस एसटी होती बंद
कोरोनाच्या भयावह संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस २२ मार्च ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत तब्बल १८० दिवस बंद होत्या. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोला एक, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तीजापूर या पाच आगारांना सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे एसटीवर मोठे आर्थिक संकट आले आहे.
सहा महिन्यांत केवळ तीस फेऱ्या
कोरोनाच्या संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद असताना अकोला आगारातून केवळ ३० फेऱ्या मारण्यात आले आहेत. परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी तीस फेऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला आगारातील बसने पूर्ण केल्या. मात्र, त्याची ही देयक अद्यापही थकलेली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.