लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्हय़ाचा ग्रामीण भाग डिसेंबर अखेरपर्यंत हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट ठरवून दिले असताना ३0 डिसेंबरपर्यंत तीन तालुक्यांत ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक गावे हगणदरीमुक्त नसल्याची आकडेवारी आहे. शौचालयाच्या कामात मागे असलेल्या बाश्रीटाकळी तालुक्याने गेल्या महिनाभरात जोमाने काम करीत ५0 टक्क्यांच्यावर उद्दिष्ट गाठले आहे. जिल्हय़ातील ग्रामपंचायतींसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. संपूर्ण ग्रामपंचायती हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट असताना तीन तालुक्यांतील शौचालय निर्मितीचे काम ५0 टक्क्यांचा टप्पाही गाठू शकलेले नाही. डिसेंबरच्या सुरुवातीला चार तालुक्यांमध्ये ५0 टक्क्यांपेक्षाही कमी ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्याची माहिती आहे. त्या नामुश्कीतून बाश्रीटाकळी तालुका बाहेर पडला आहे. ४५ टक्क्यांवर असलेल्या या तालुक्यातील काम ५१ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. आता चार तालुक्यांतील ५0 टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. त्यामध्ये अकोला, अकोट, पातूर, बाश्रीटाकळी तालुक्यांचा समावेश आहे. इतर तीन तालुक्यांमध्ये आता ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तेल्हारा तालुका अद्यापही सर्वात मागेहगणदरीमुक्तींमध्ये तेल्हारा सर्वात मागे आहे. त्या तालुक्यात आतापर्यंत एकूण ग्रामपंचायतींपैकी केवळ २६ टक्के ग्रामपंचायतीच हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर बाळापूर तालुका-३७.८८ टक्के, मूर्तिजापूर-४६.५१ टक्के ग्रामपंचायती हगणदरीमुक्त असल्याची आकडेवारी आहे.