बाश्रीटाकळी (जि.अकोला), दि. २६- तालुक्यातील रेडवा फाट्यावजवळ बाश्रीटाकळी पोलिसांनी ३१ लाख ८0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त केलेला माल २७ मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. बाश्रीटाकळी पोलिसांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आयशर ट्रक क्रमांक एमएच ४३ वाय ५१६१ ला रविवारी दुपारी ५ वाजता अडविले. संशय आल्यामुळे सदर ट्रक बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनला आणून त्याचा पंचनामा केला असता, त्यामध्ये १00 बॅग गुटखा आढळला. प्रत्येक बॅगमध्ये सहा बंडलची छोटी बॅग होती. बाजार किमतीनुसार सदर गुटखा ३१ लाख ८0 हजार रुपये किमतीचा आहे. सदर ट्रक हा हैदराबादवरून गुटखा भरून खामगाव येथे जात असल्याची माहिती ट्रकचालक व क्लिनर यांनी दिली. हैदराबाद येथून महाराष्ट्रात येतो गुटखा बाश्रीटाकळी पोलिसांच्या या मोठय़ा कारवाईतून हैदराबाद येथून राज्यात गुटखा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हैदराबाद येथून हा माल थेट बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजारपेठेत जात होता.
३१ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 3:02 AM