पाचवीपासून दहावीपर्यंतच्या जिल्ह्यात एकूण १२८६ शाळा आहेत. सर्व शाळा सुरू करीत असताना शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये अद्यापपर्यंत सुरू न झालेल्या ३१ शाळांमधील शिक्षकांचाही समावेश असून, काही शाळा निवासी असल्याने सुरू होऊ शकल्या नाहीत. सुरू झालेल्या १२५५ शाळांमध्ये सद्य:स्थितीत १ लाख ४ हजार ८७२ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळा बंद असल्याची कारणे
जिल्ह्यातील पाचवी ते दहावीच्या १२८६ शाळांपैकी १२५६ शाळा सुरू झाल्या; तर ३१ शाळा बंद आहेत. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे संबंधित शाळांमधील काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय काही शाळा निवासी असल्याने सुरू झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कुठलाही धोका होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने तूर्तास संबंधित ३१ शाळा बंद आहेत. मात्र लवकरच या शाळाही सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात २८ शिक्षक, कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह
पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळांवर शिकविणाऱ्या सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील २८जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संबंधितांवर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत. कोरोनातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बरे झाल्यानंतर सदर शाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील शाळांची परिस्थिती
पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा
१२८६
सुरू झालेल्या शाळा
१२५५
विद्यार्थी संख्या
एकूण विद्यार्थी १,०४,८७२
उपस्थित विद्यार्थी ३५,३४३