लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी तयार करण्यात आलेल्या ३१० कोटींच्या विकास आराखड्यावर मंगळवारी आयोजित बैठकीत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. यासंदर्भात उद्या बुधवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २४ गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. नवीन प्रभागांमध्ये रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची कोणतीही सुविधा नसल्याचे चित्र समोर आले. नवीन प्रभागातील विकास कामांसाठी शासनाकडे निधीची मागणी करीत सत्ताधाऱ्यांनी ३१० कोटींचा विकास आराखडा तयार केला. प्रशासनाने प्रस्ताव शासनाकडे सादर केला. आराखड्याच्या मुद्यावर नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मंगळवारी नगर विकास विभागात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला मनपा आयुक्त अजय लहाने उपस्थित होते. यावेळी विकास आराखड्यावर प्राथमिक स्वरूपाची चर्चा पार पडली असून, उद्या बुधवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
३१० कोटींचा आराखडा; आज मुंबईत पुन्हा बैठक!
By admin | Published: July 12, 2017 1:18 AM