अकोला: महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मंगळवारी आढावा बैठक घेऊन अस्वच्छता, कॅरिबॅगचा सर्रास वापर यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. त्याचा परिणाम बुधवारी दिसून आला. स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील चारही झोनमध्ये ३२ फळ, भाजी विक्रेत्यांसह प्लास्टिक पत्रावळी, द्रोण विकणाऱ्या दोन प्रतिष्ठानांवर छापे घालून तब्बल पाच क्विंटल कॅरिबॅगसह प्लास्टिक वस्तूंचा साठा जप्त करून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धडक कारवाई करा अन्यथा निलंबित व्हा, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर मरगळ आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३ जुलै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात चारही झोनअंतर्गत ३२ फळे, भाजी व इतर विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून एकूण ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, तसेच मनपा उत्तर आणि पूर्व झोन अधिकाऱ्यांनी कोठडी बाजार स्थित मॉ सती सेल्सवर छापा घालून प्लास्टिकचे द्रोण, पत्रावळी, ग्लास, स्ट्रॉ आणि कॅरिबॅगचा अडीच क्विंटल साठा जप्त करून १० हजार दंड ठोठावला. टिळक रोडवरील अलंकार मार्केट येथील हरदेव ट्रेडर्समधूही दीड क्विंटल प्लास्टिकचा साठा जप्त करून १० हजारांचा दंड ठोठावला. ही कारवाई मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या उपस्थितीत सहा. आयुक्त विजय पारतवार व आरोग्य निरीक्षकांनी केली.