- संजय खांडेकरअकोला: अकोला, वाशिम आणि बुलडाण्याच्या तीन जिल्ह्यांतील १५ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची संख्या शेकडोंच्या घरात पोहोचली; मात्र महिला उमेदवारांची संख्या केवळ १७ म्हणजे नगण्य टक्केवारीत गणल्या जात आहे. एकीकडे महिलांना ३३ टक्के आरक्षण असले तरी राजकारणात मात्र महिलांना पुढाकार देण्यात कुटुंब आणि राजकीय पक्षांचा कोतेपणा दिसून येत आहे.पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या देशात बोटांवर मोजण्याएवढ्याच महिला राजकारणात यशस्वी झाल्या. प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते; मात्र स्त्रियांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात न आणण्यासाठी पुरुषांचाच पुढाकार नडत असल्याचे अधोरेखित होत आहे. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून महिलांनी पुढे यावे म्हणून ३३ टक्के आरक्षण दिले गेले; मात्र राजकारणात आणि उमेदवारीत किती महिलांना विविध राजकीय पक्ष उमेदवारी देतात, याची आकडेवारी धक्कादायक आहे. तीन जिल्ह्यांतील १५ विधानसभा मतदारसंघांतील ज्या महिलांनी उमेदवारी दाखल केली, त्यांची आकडेवारी केवळ १७ च्या घरात पोहोचली आहे.अकोला जिल्ह्याच्या पाच मतदारसंघांत सहा महिलांची उमेदवारी आहे. पश्चिममधून सुमन तिरपुडे (पीपीआय), अकोला पूर्वमधून प्रीती सदांशिव (आरपीआय), मूर्तिजापूरमधून प्रतिभा अवचार (वंचित ब.आ.), अकोटमधून शोभा शेळके, (अपक्ष) बाळापूरमधून वर्षा बगाडे (अपक्ष) व सुनीता वानखडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.बुलडाणा जिल्ह्याच्या सात विधानसभा मतदारसंघांत नऊ महिलांची उमेदवारी आहे.चिखलीमधून श्वेता महाले (भाजप), परवीन सय्यद हारूण (बसपा), सिंदखेड राजा येथून सविता मुंडे (वंचित ब.आ.), तारामती बद्रीनारायण जायभाये (अपक्ष), संगीता मुंढे (अपक्ष), मेहकरमधून रेखा प्रतापसिंग बिबे (अपक्ष), खामगावमधून रंजना श्रीकृष्ण गायकवाड (अपक्ष), जळगाव जामोदमधून डॉ. अपर्णा कुटे (भाजप), डॉ. स्वाती वाकेकर यांचा समावेश आहे.वाशिम जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघांत दोन महिला उमेदवार आहेत. रिसोड येथून सोनाली साबळे (अपक्ष) आणि वाशिममधून रजनी राठोड (काँग्रेस) यांची उमेवारी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत १७ पैकी किती महिला माघारी फिरतात, याकडे लक्ष लागले आहे.