अकोला : महावितरणने एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या १० महिन्याच्या काळात वीज बिल भरण्याचा कुठलाच तगादा न लावता अखंडित वीज पुरवठा केला आहे. या काळात अकोला परिमंडळातील लघूदाब वर्गवारितील ३ लाख ३९ हजार ७४२ ग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही वीजबिल भरले नसल्याने वीज देयकापोटी त्यांच्याकडे २८५ कोटी रूपये थकले आहे. महावितरण आर्थीक संकटातून जात असल्याने थकबाकीदार ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. राज्यातील खाजगी वीज वितरण कंपन्या थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा ऑक्टोबर २०२० पासूनच खंडित करीत आहेत. महावितरणकडून मात्र माहे फेब्रुवारी २०२१ पासून थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. याशिवाय महावितरण ही वीज ग्राहकांसारखी वीज निर्मिती कंपन्याची एक ग्राहकच असल्याने वीज बिलाच्या सुमारे ८५ टक्के खर्च हा वीज खरेदीवर होत असतो. पण मागील दहा महिन्यात वाढलेली थकबाकीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे भविष्यात महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरण ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास कटीबद्ध आहे. हेल्प डेस्कद्वारे वीज बिलांसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. याबद्दल ग्राहकांनी समाधानही व्यक्त केलेले आहे.
अशी आहे जिल्हानिहाय थकबाकी
परिमंडलात एप्रिल २०२० नंतर एकदाही बिल न भरणाऱ्या विविध वर्गवारीतील ग्राहकांमध्ये अकोला जिल्ह्यातील १ लाख १६१५९ ग्राहक असून त्यांच्याकडे १०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. बुलढाणा जिल्हयातील १ लाख ७० हजार ७० ग्राहकाकडे १३२ कोटी व वाशिम जिल्ह्यातील ५३ हजार ५१३ ग्राहकांकडे विज देयकापोटी ४४ कोटी थकले आहेत.