अकोला: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्याने, आंतरजिल्हा बदलीने अकोल्यात आलेल्या ३४ शिक्षकांना पुन्हा मूळ पदस्थापनेच्या जिल्ह्यात परत जावे लागणार आहे.आंतरजिल्हा बदलीने वर्षभरापूर्वी अकोल्यात ३४ शिक्षक आले होते. आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषदेत आलेल्या या शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात परत जाण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गतवर्षी दिला होता. या आदेशाविरुद्ध संबंधित शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यांची ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २७ फेबु्रवारी रोजी दिला. याचिका फेटाळण्यात आल्याने, आंतरजिल्हा बदलीने अकोल्यात आलेल्या ३४ शिक्षकांना पुन्हा ते ज्या जिल्ह्यातून आले, त्याच जिल्ह्यात परत रुजू व्हावे लागणार आहे. या शिक्षकांच्या वेतनासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जमा केलेले पैसेदेखील आता जिल्हा परिषद प्रशासनाला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शिक्षकांचे वेतन त्यांच्या पदस्थापनेनंतर संबंधित जिल्हा परिषद प्रशासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.