अकोला : जिल्ह्यातील रिक्त १४७ कोतवाल पदांसाठी राबविण्यात येत आलेल्या भरती प्रक्रियेत रविवार २० ऑगस्ट रोजी अकोला शहरातील १२ केंद्रांमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हयातील ३ हजार ५१३ उमेदवारांनी कोतवाल पदाची परीक्षा दिली असून, १२१ उमेदवार या परिक्षेला गैरहजर होते. शांततेच्या वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडली.
गावपातळीवर महसूल प्रशासनातील कामकाजाची महत्त्वपूर्ण भूमिका कोतवालांकडून बजावली जाते. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोतवालांची १४७ पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रिक्त असलेली कोतवालांची पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या रिक्त पदांसाठी गेल्या ३१ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत १४७ पदांसाठी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर ३ हजार ८८५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते.
छाननी प्रक्रियेत अर्ज पात्र ठरलेल्या ३ हजार ६३४ उमेदवारांची लेखी परीक्षा २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अकोला शहरातील १२ केंद्रांमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हयातील ३ हजार ५१३ उमेदवारांनी कोतवाल पदाची परीक्षा दिली असून, उर्वरित १२१ उमेदवार या परिक्षेला गैरहजर होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी शहरातील काही परीक्षा केंद्रांना भेट देवून पाहणी केली. परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात सकाळी ६ ते सायंकाळी ८ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही परीक्षा शांततेच्या वातावरणात सुरळीत पार पडली.
तालुकानिहाय अशी आहेतकोतवालांची रिक्तपदे!
तालुका रिक्तपदे
- अकोला ३०
- अकोट २७
- तेल्हारा १४
- बार्शीटाकळी २१
- पातूर १२
- मूर्तिजापूर २२
- बाळापूर २१