अकोला, दि.२ : महावितरणचा वीज ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, जिल्ह्यातील सर्वच प्रकारातील एकूण २,०३,४६६ ग्राहकांकडे ३६१.६४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी सर्वाधिक २९४.१२ कोटींची थकबाकी कृषीपंपधारकांकडे आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राला महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील वीज देयकांची वसुली करताना मात्र महावितरणच्या नाकीनऊ येत आहेत. राज्यभरातील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वीज पुरवठ्याच्या तुलनेत अपेक्षित वसुली होत नसल्यामुळे महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. जानेवारी २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकूण २,०३,४६६ ग्राहकांकडे ३६१.६४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, पाणीपुरवठा योजना, पथदिवे व कृषीपंपधारक शेतकरी या वीजग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वीज देयक भरण्यास टाळाटाळ होत असल्याने दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. थकबाकी वाढत असल्याने महावितरणने थकबाकीदार ग्राहकांकडून थकीत वीज देयकांची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांनी थकीत वीज देयक भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
वीज ग्राहकांकडे ३६१ कोटींची थकबाकी!
By admin | Published: March 03, 2017 2:07 AM