- प्रवीण खेते
अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अनेकांनी लसीचा पहिला डोस घेण्याची मोठी घाई केली होती. लांबलचक रांगांमध्ये उभे राहून पहिला डोस घेतला, मात्र आता मुदत संपूनही जिल्ह्यातील सुमारे ३७ हजार ४३५ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. कोविडपासून बचावासाठी नागरिकांनी लस घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन केले जाते, मात्र लसीच्या दुसऱ्या डोससाठी कुणाला कंटाळा, तर कोणाची बेफिकरी होताना दिसून येत आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मृत्यूचा आकडाही वाढला होता. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी भीतीपोटी अनेकांनी लस घेण्याकरिता धावपळ केली होती. मध्यरात्रीनंंतर लोक लसीकरण केंद्राबाहेरच रात्र काढू लागले होते. आता मात्र कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने लसीकरणाकडे अनेकांनी पाठ केल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला, अशांना ८४ दिवसांनंतर, तर कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना २८ दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. ही मुदत पूर्ण करूनही जिल्ह्यातील सुमारे ३७ हजार ४३५ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुलनेने लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या रोजच्या अहवालात कमी दिसून येते. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे.
लस - दुसऱ्या डोससाठीची मुदत - मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नाही
कोविशिल्ड - ८४ - २४,१२९
कोव्हॅक्सिन - २८ - १३,३०६
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस - ४,७५,०८२
दुसरा डोस - १,९६,७२६
पहिला डोस घेतला म्हणून तुम्ही पूर्ण सुरक्षित नाही
कोरोनापासून बचावासाठी लसीचा पहिला डोस घेतला म्हणून कोणी पूर्णत: सुरक्षित नाही. लसीचे दोन्ही डोस घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे आकडे सांगतात, मात्र त्यांना कोरोनाचे गंभीर लक्षणे दिसून आले नाही. त्यामुळे केवळ पहिला डोस घेऊन लसीकरणाकडे पाठ न करता मुदतीमध्ये लसीचा दुसरा डोसही घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
लसीच्या दोन्ही डाेसमध्ये ठरावीक अंतर ठेवण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दिलेल्या मुदतीत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. काही लोक मुदतीमध्ये आहेत, तर काहींची मुदत संपून बराच काळ लोटला आहे, अशा लोकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा. जेणेकरून कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळेल.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला