अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फत अकोला-पातुर दरम्यान नवनिर्मित महामार्गाच्या दुतर्फा रविवारी एकाच दिवशी ३ हजार ७७५ वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, उपवनसंरक्षक के. अर्जुना, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, एनसीसीचे कर्नल चंद्रप्रकाश भदोला, सुरेंद्र धिमन, काशीनाथ तिवारी, मनोज यादव, तेजराव थोरात, कापशी येथील सरपंच अंबादास उमाळे, चिखलगावचे सरपंच,वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, पोलीस उपनिरीक्षक हर्षु रत्नपारखी, मजिद पठाण, सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे संचालक डॉ. सचिन कोकाटे, ॲड. मुरलीधर इंगळे आदी उपस्थित होते. वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी ओळखून प्रयत्न करण्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राष्ट्रीय राजमार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली असून,यामुळे प्रदूषणातही घट होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अकोला पातूर महामार्गावरील चिखलगाव,भंडारज फाटा,लाखनवाडा,कापशी दरम्यान रविवारी ३ हजार ७७५ वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीकरिता नाथन, चिखलगाव, कापशी, राजंदा येथील शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, नॅशनल कॅडेट कोरचे विद्यार्थी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सुमित देवडा व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.