अकोला : अल्प पावसाची झळ खरीप हंगामातील सर्वच पिकांना बसली. या परिस्थितीत रब्बी साथ देईल, अशी शेतकर्यांना आशा होती. परंतु भेगाळलेल्या शेताची स्थिती बघता आजमितीस पश्चिम विदर्भातील ३८ टक्के रब्बी क्षेत्र नापेर आहे. जमिनीत ओलावा नसल्याने पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांची झोप उडाली आहे. तसेच पाणीटंचाईचा सामना करताना शेतकर्यांना गुरांचा सांभाळ करणे कठीण झाले आहे.आतापर्यंंंत पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पण, ज्या शेतकर्यांनी विविध रब्बी पिकांची पेरणी केली आहे. त्या पिकांसाठी लागणारा ओलावा जमिनीत नसल्याने रब्बी पिकांची अवस्था वाईट आहे. बहुतांश ठिकाणी हरभरा एकतर उगवला नाही, आणि जेथे उगवला तेथे कीड, मर रोगाने उच्छाद मांडला आहे. ज्या शेतकर्यांकडे संरक्षित पाण्याची सोय आहे; परंतु यावर्षी अपेक्षित जलसाठा संकलित झाला नसल्याने तेथे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे अपेक्षित उत्पादनाची शाश्वती कमीच वाटत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.यावर्षीचा खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामावर शेतकर्यांची भिस्त होती; परंतु परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बी हंगामातील उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, कोरडे शेत ठेवून करायचे काय, म्हणून शेतकर्यांनी छातीवर दगड ठेवून रब्बीची पेरणी केली आहे. अमरावती विभागात ५.९३ लाख हेक्टर रब्बीचे सरासरी क्षेत्र आहे. तथापि कृषी विभागाने यावर्षी ९ लाख ५७ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन केले होते. परंतु आतापर्यंंंत ३.६८ लाख हेक्टरवर पेरणी झाली असूून, उर्वरित उद्दिष्ट साध्य होते की नाही, याकडे कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.
अद्यापही ३८ टक्के रब्बी क्षेत्र नापेर!
By admin | Published: December 07, 2015 2:31 AM