अकोला : इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत अकोल्यातील ३९ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हे विद्यार्थी परीक्षेच्या दुसर्या निवड चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर या संस्थेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित, या विषयांवर आधारित असून, इयत्ता १0 वी नंतरचे विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरतात. यंदा विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेला १ लाख ३२ हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ दहा टक्के विद्यार्थ्यांची निवड ही दुसर्या चाचणीसाठी करण्यात येते. त्या अनुषंगाने २७ डिसेंबरच्या दरम्यान निकाल जाहीर झाला असून, यामध्ये देशभरातून १३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये अकोल्यातील ३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेच्या दुसर्या निवड चाचणीतून देशभरातील केवळ ३0 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या चाचणीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांंसाठी २0 दिवसांची कार्यशाळा घेण्यात येणार असून, या ठिकाणी त्यांना देशातील तज्ज्ञ वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन कार्यशाळेतून आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेसाठी केवळ ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे पाच विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, त्यांची जबाबदारी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात येणार आहे. गणित विषयात विदर्भातील ५ विद्यार्थ्यांंची निवड विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत गणित विषयातून विदर्भातील ५ विद्यार्थ्यांंची निवड झाली. यामध्ये अकोल्यातील राम राखुंडे या विद्यार्थ्याचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांंसाठी पुणे येथील भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या वतीने ४ दिवसीय कार्यशाळा आयोजित केली असून, राम राखुंडे हा पुण्यासाठी रवाना झाला आहे.
विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये अकोल्यातील ३९ विद्यार्थ्यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2015 2:40 AM