अकोला : अमरावती विभागातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील खारपाणपट्टयात मोडणार्या ४ लाख १६ हजार हेक्टर जमिनीचा कायापालट होणार आहे. राज्य व केंद्र सरकार तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने खारपाणपट्टय़ाचा विकास करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये मोडणार्या खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी १६ डिसेंबर २0१५ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात जागतिक बँकेचे अधिकारी व कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ.जैन, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव मालिनी शंकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ सुभाष टाले, कृषी विभागाचे सह संचालक आणि इतर अधिकार्यांसोबत चर्चा झाली होती. खारपाणपट्टा विकास कामांबाबत आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये खारपाणपट्टा विकासासाठी डॉ. पंदेकृविच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रिसर्स अँण्ड डेव्हल्पमेंट प्रोजेक्ट स्थापन करण्याची मागणी आ. सावरकर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठपुरावा करून खारपाणपट्टय़ासाठी त्याचा होणारा फायदा याबाबत माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. दिल्ली येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळ निवारणासाठी १0 हजार कोटी रुपयाची मागणी केली. तसेच शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यांसाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने योजना राबविण्यासाठी ४ हजार कोटी आणि सिंचनाच्या योजना राबविण्यासाठी ७ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा या पूर्णा नदीच्या खारपाणपट्टय़ातील गावातील समस्यासंबंधी पंतप्रधानांकडे व्यथा मांडल्यावर त्यांनी या परिसरातील ४ लाख १६ हजार हेक्टर जमिनीच्या विकासासाठी निधी देण्याकरिता तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे जागतिक बँकेच्या सहाय्याने तिन्ही जिल्ह्यातील १६ तालुक्यातील खारपाणपट्टय़ातील गावांना नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. त्यामुळे या परिसरातील ९ लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
खारपाणपट्टय़ातील ४ लाख हेक्टर जमिनीचा होणार कायापालट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2016 2:23 AM