अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारंजा येथे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांनी सात जुगारींना अटक केली असून, त्यांच्याकडून ४ लाख ५ हजार ८१० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या जुगारींविरु द्ध उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर छापा टाकण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, कारंजा येथील अविनाश तायडे याच्या शेतात रामकाटीच्या झाडाखाली अविनाश तायडे व काही इसम हे पैशाच्या हारजीतवर मोठा जुगार चालवित आहे. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता या जुगार अड्ड्यावरून दीपक मोहनसिंग राजपूत (४०) रा. अंदुरा, गणेश ज्ञानदेव येरोकार (२७) रा. नया अंदुरा, रमेश किसन चोपडे (६५) रा. बहादुरा, संजय नामदेव उमाळे (५०) रा. नया अंदुरा, रामराव लक्ष्मण आमझरे (५२), रा. अडसूळ, सदानंद नामदेव नवलकार (४८) रा. अडसूळ व शेतमालक अविनाश तायडे पाटील (५०) रा. कारंजा असे मिळून आले. या जुगारींना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. या सातही जुगारींविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध तसेच कोविड १९ या संसर्गजन्य रोगाचा प्रसार करण्याबाबत भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार अ. बहाकर व त्यांच्या पथकाने केली आहे.