लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सर्वोपचार रुग्णालयात आयोजित दोन दिवसीय हृदय रुग्ण बालकांसाठी विशेष टु डी ईको शिबिरात गुरुवारी १५० बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यातील ३१ बालकांवर मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गुरुवारी उर्वरित बाल रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व त्यांच्या पत्नी डॉ. इंद्राणी प्रसाद यांनी शिबिराला भेट देऊन बालरुग्णांसह त्यांच्या पालकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांमधील ० ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यातील संशयित हृदयरुग्ण बालकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात टू डी ईको शिबिर घेण्यात आले.या दोन दिवसीय शिबिरात १५० हृदयरुग्ण बालकांची तपासणी करण्यात आली असून, यातील ३१ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या बालकांवर लवकरच मुंबई येथे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकिशोर कांबळे यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या शस्त्रक्रियांमुळे पालकांना दिलासा मिळणार आहे.
१५० पैकी ३१ बालकांवर होईल हृदय शस्त्रक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:04 AM