अकोला : दिवाळी सण आटोपल्यानंतरही प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने अकोला मार्गे धावणाऱ्या ४ विशेष रेल्वेना डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या एकूण ६० फेऱ्या वाढविण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र.०२१३९ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर सूपरफास्ट स्पेशल २८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. तर ०२१४० नागपूर - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष भाड़े सुपरफास्ट स्पेशल ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा प्रत्येकी ११ फेऱ्या वाढल्या आहेत.
गाडी क्र. ०२१४४ नागपूर - पुणे विशेष भाडे वातानुकूलित विशेषला २८ डिसेंबरपर्यंत, तर ०२१४३ पुणे - नागपूर विशेष भाडे वातानुकूलित विशेषला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्र. ०११२७ मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह विशेष भाडे सुपरफास्ट स्पेशलची मुदत २६ डिसेंबरपर्यंत, तर ०११२८ बल्हारशाह - मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष भाडे सुपरफास्ट स्पेशलची मुदत २७ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
पुणे-अमरावती-पुणे विशेषच्या १८ फेऱ्या वाढल्यापुणे व अमरावती या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या अप व डाऊन प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.१ डिसेंबरपर्यंत अधिसुचीत असलेल्या ०१४३९ पुणे - अमरावती विशेष रेल्वेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत, तर २ डिसेंबरपर्यंत अधिसुचीत असलेल्या ०१४४० अमरावती - पुणे विशेष रेल्वेची मुदत १ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.