अकाेला : कुरिअर कंपनीद्वारे अकाेल्यातील बसस्थानकाच्या परिसरात एका पार्सलमध्ये आलेली ४० किलाे चांदी पाेलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतली असून ती नेमकी कुणाची आहे, या दृष्टीने या चांदीचा तपास सुरू करण्यात आला आहे़. चांदी आणणाऱ्या व्यक्तीने दस्तऐवज सादर केल्यानंतर जीएसटी, इन्कम टॅक्स व पाेलिसांकडून या चांदीची इन कॅमेरा चाैकशी सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली़.
मध्यवर्ती बसस्थानकावर एका व्यक्तीकडे तब्बल ४० किलाे चांदी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ या माहितीवरून पाेलिसांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले़. त्यांनतर झडती घेतली असता या व्यक्तीकडे ४० किलाे चांदी असल्याचे उघड झाले़ ती अकाेल्यातील काही साेनारांची असल्याचे समाेर आल्यानंतर पाेलिसांनी जीएसटी तसेच आयकर विभागाला पत्र देऊन चाैकशी सुरू केली़. शुक्रवारी रात्री उशिरा साेनार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमाेर या चांदीची चाैकशी आयकर विभाग, जीएसटी विभाग व पाेलिसांनी सुुरू केली हाेती़. अकाेल्यातील काही सराफांनी ही चांदी मागविल्याचे प्राथमिक स्वरूपात समाेर आले असून, त्याचे दस्तऐवजही सादर केल्याची माहिती आहे़. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या चांदी जप्तीमध्ये अवैध प्रकार नसल्याची माहिती आहे़. मात्र संबंधित तीनही विभागांची चाैकशी पूर्ण झाल्यानंतर ही चांदी संबंधितांना परत करण्यात येणार असल्याचे समजते. या चांदीची किंमत सुमारे ३० लाख रुपयांच्या घरात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे़.