कुष्ठरोग आणि क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी १ डिसेंबरपासून राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातही घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली जात असून, नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. मोहिमेंतर्गत आतापर्यंत ४० क्षयरुग्ण आरोग्य विभागाच्या चमूला आढळून आले आहेत. या रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. ही मोहीम १६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार होती. परंतु, अनेक भागात पुन्हा सर्वेक्षण केले जाणार असल्याने ही मोहीम आता ३१ डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्णांची शोधमोहीम अद्यापही सुरूच असल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
रुग्णांचे एक्स-रे, थुंकीची तपासणी
सर्वेक्षणादरम्यान आरोग्य विभागातर्फे रुग्णांचे एक्स-रे आणि थुंकीची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसारच त्यांना पुढील उपचार दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुग्णांना ५०० रुपये मानधन
मोहिमेंतर्गत आढळलेल्या क्षयरुग्णास औषधोपचारासाठी ५०० रुपये प्रतिमहा मानधन दिले जाणार आहे. शिवाय, खासगी दवाखान्यात निदान झालेल्या क्षयरुग्णाची माहिती देणाऱ्या डॉक्टरांनाही प्रति रुग्ण ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे.
रुग्ण शोधमोहीम ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेंतर्गत रुग्णांचे एक्स-रे आणि थुंकीची तपासणी केली जाणार असून, त्यानुसार त्यांच्यावर उपचार केला जाणार आहे.
- डॉ. मेघा गोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला