अकाेला : विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचा वसा उचलणारे शिक्षकच खाेटे बाेलतात, हे सिद्ध झाले आहे. अकाेला जिल्हा परिषदेत २०१८ मध्ये राबविण्यात आलेल्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत ऑनलाईन पाेर्टलवर ४० शिक्षकांनी खाेटी माहिती भरून साेयीच्या ठिकाणी बदली करून घेतल्याचे अखेर सिद्ध झाले आहे. अशी खाेटी माहिती भरणारे तब्बल ४० शिक्षक असून त्यांची एक वेतनवाढ राेखण्यात यावी, असे आदेश ८ फेब्रुवारी राेजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. अकाेला जिल्हा परिषदेत २०१८ मध्ये जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात आली. शिक्षकांनी त्यांची माहिती पाेर्टलवर भरण्याचे बंधन हाेते तसेच बदलीसाठी पसंतिक्रम देण्याबाबतही सूचना हाेत्या. या साेयीचा गैरफायदा घेत जिल्हा परिषदेतील तब्बल ४० शिक्षकांनी आपल्याला साेयीचे ठिकाण मिळावे म्हणून खाेटी माहिती सादर केली. अपंग नसतानाही अपंग असल्याचे नमूद केले. पती पत्नी एकत्रीकरण नियमाचा लाभ घेण्यासाठी खासगी आस्थापनेत कामाला असलेल्या पतीला सरकारी आस्थापनेवर दाखविणे, अंतरामध्ये किलाेमीटरचा घाेळ अशी अनेक खाेटी कारणे नमूद करून अवघड जागी बदली हाेऊ नये असा प्रयत्न केला. या खाेट्या कारणांमुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला व या ४० शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदली झाली नाही. या प्रकरणात तक्रारी झाल्यानंतर चाैकशी करण्यात आली. त्यामध्ये ४० शिक्षकांचे खाेटे प्रताप समाेर आले आहेत.
बाॅक्स.......
दाेन वर्षानंतर नाममात्र शिक्षा
सन २०१८ च्या बदली प्रक्रियेत खाेटी माहिती सादर केल्या गेली, हे सिद्ध हाेण्यासाठी तब्बल दाेन वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतरही महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ मधील कलम ४ २ अनुसार केवळ एक वेतनवाढ कायमस्वरूपी राेखण्याची शिक्षा संबंधित शिक्षकांना देण्यात आली आहे.
बाॅकस.......
अवघड जागी बदली झालेल्यांना मनस्ताप
शिक्षक बदली प्रकरणात ४० शिक्षकांनी खाेटी माहिती सादर करून साेयीच्या ठिकाणी बदली करून घेतली. त्यामुळे इतर ४० शिक्षकांना त्यांची काहीही चूक नसताना अवघड जागी बदलीवर जावे लागले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचे आदेश काढताना अशा शिक्षकांना त्यांची चूक नसताना विस्थापित व्हावे लागले अशी कबुली दिली आहे. त्यामुळे या शिक्षकांना झालेल्या मनस्तापाची भरपाई जिल्हा परिषद करणार का, असा प्रश्नच आहे.
बाॅकस.......
खाेटे बाेलण्यात महिला शिक्षक आघाडीवर
ज्या ४० शिक्षकांवर खाेटी माहिती भरल्यामुळे वेतनवाढ राेखण्याची कारवाई केली आहे त्यामध्ये सर्वाधिक २४ शिक्षिका आहेत तर १६ शिक्षक आहेत हे विशेष.
बाॅक्स.......पंचायत समितीनिहाय शिक्षक
अकाेला १९ अकाेट ०४ मूर्तिजापूर ०२ बाळापूर ०५ बार्शीटाकळी ०७ पातूर ०३