संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0 केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटात समाविष्ट दारिद्रय़ रेषेखालील (बीपीएल) आणि अत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून धान्याचा लाभ देण्यात येतो. दरम्यान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्य गटात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल )शेतकर्यांना प्रती किलो तीन रुपये दराने गहू आणि प्रती किलो दोन रुपये दराने तांदूळ वितरीत करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै रोजी २0१५ रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात दरमहा गहू व तांदळाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हय़ात २ लाख ७५ हजार ५४४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४0 हजार ८८0 केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणे बाकी आहे. त्यामुळे धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार आणि प्रत्यक्षात सवलतीच्या दरातील गहू व तांदळाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१ लाख ३७ हजार क्विंटल धान्य नियतनाची मागणीराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक २ लाख ७५ हजार ५४४ लाभार्थी शेतकर्यांना धान्य वितरित करण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता १ लाख ३७ हजार ७७0 क्विंटल धान्याचे नियतन मंजूर करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार २६६ क्विंटल गहू आणि ५ हजार ५१0 क्विंटल तांदूळ नियतनाचा समावेश आहे.