खेट्री (जि. अकोला): पातूर तालुक्यातील आलेगाव पोलिस चौकी अंतर्गत आलेगाव-मळसूर मार्गावर दारुची अवैधरित्या वाहतूक करणाºया दोघांना अटक करून त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी ही कारवाई केली.आलेगाव पोलीस चौकी अंतर्गत अनेक गावात गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्रीला उधाण आले असून त्यामुळे वादविवाद, तंटे, चोरीच्या घटना होत आहे. तसेच अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून, अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. परंतु याकडे आलेगाव पोलीस चौकीचे दुर्लक्ष होत असून, कारवाई करण्याकडे कानाडोळा करीत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.अवैध देशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सापळा रचून २१ फेब्रवारी रोजीच्या सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मळसूर-आलेगाव मार्गावरील गोळेगाव फाट्यानजीक दुचाकीवर अवैध देशी दारू वाहतूक करणाºया दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून देशी दारुच्या ४३० बाटल्या किंमत ४० हजार रुपये, दोन मोबाइल किंमत दोन हजार व एक मोटारसायकल किंमत ३० हजार रुपये असा ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मळसूर येथील आरोपी प्रशांत स्वामी दंडवेने व श्रीनिवास बालाजी नैनीवार यांच्याविरुद्ध चान्नी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)