सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अंगणवाडीसेविकांच्या खात्यावर शासनाने जमा केलेला एक रुपया गेला कोठे, याचा शोध महिला व बालकल्याण विभागाकडून घेतला जात आहे. जिल्ह्यातील २४०० पैकी चारशेपेक्षाही अधिक अंगणवाडी सेविकांच्या खात्यात एक रुपया जमा न झाल्याने त्याबाबतची पडताळणी सुरू आहे. उद्या मंगळवारपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी महिला व बालकल्याण आयुक्तांच्या आदेशाने यंत्रणा राबत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन मिळण्यास २ ते ३ महिन्यांचा विलंब होत असल्याने त्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होते. याची दखल घेत आयुक्तालयातील लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कनिष्ठ स्तरावरील मानधन वितरणाचे काम आयुक्तालय स्तरावर घेतले. त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले. राज्यातील २ लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या प्रणाली अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवायोजना कार्यालयामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन एकत्रितरीत्या जुलै २०१७ पासून आधार संलग्न बँक खात्यात दरमहा थेट जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या महिला व बालकल्याण अधिाऱ्यांना आयुक्तालयाकडे माहिती सादर केली. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा आधार क्रमांकाशी संलग्नित बँक खाते क्रमांक देण्यात आला. मानधनाची रक्कम आॅनलाइन खात्यात जमा करण्यापूर्वी त्याची पडताळणी केली जात आहे. लाभार्थीच्या खाते क्रमांकावर मानधनाची रक्कम जमा होईल की नाही, हे पाहण्यासाठी आयुक्तालयाने प्रत्येक खात्यावर एक रुपया जमा केला आहे. तो एक रुपया लाभार्थींच्या खात्यातच जमा झाल्याची खात्री करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला बजावण्यात आले. त्यानुसार किती अंगणवाडी सेविकांच्या खात्यात तो एक रुपया जमा झाला, हे शोधण्याचे काम सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील २४०० पैकी २००३ खात्यावर रुपया जमा झाला. उर्वरित ४०० खात्यावरचा रुपया गेला कोठे, याची पडताळणी उद्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अंगणवाडी सेविकांच्या खात्याची पडताळणी उद्यापर्यंत पूर्ण होईल, आधार संलग्नित खात्याशिवाय इतर खातेक्रमांक दिले असतील, तर तेही स्पष्ट होईल. त्या माहितीनुसार जून आणि जुलैचे मानधन खात्यात जमा होणार आहे. - एस.पी. सोनकुसरे, महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
एक रुपयाच्या शोधासाठी ४०० बँक खात्याची चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:35 AM