लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, बाधित कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी शासनामार्फत शुक्रवारी मदत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३0 हजार १२६ हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाईपोटी कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत मिळणार आहे. मदतीचा हा आकडा हा ४00 कोटींपेक्षा जास्त असेल. राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकर्यांसाठी कृषिमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांनी २२ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात विधानसभेत मदत जाहीर केली. त्यामध्ये कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी ‘एनडीआरएफ’ मार्फत ६ हजार ८00 रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १४ हजार रुपयांची मदत, अशी एकूण ३0 हजार ८00 रुपये प्रतिहेक्टर मदत बाधित कापूस उत्पादक शेतकर्यांना देण्यात येणार आहे. तसेच बागायत कापूस उत्पादक शेतकर्यांना ३७ हजार ५00 रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे दोन हेक्टर र्मयादेपर्यंत मदत देणार आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यात १ लाख ३0 हजार १२६ हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकर्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे.
४00 कोटी ४0 लाखांच्यावर मदत!बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या बाधित कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३0 हजार १२६ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पीक नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकर्यांना मदत वाटपासाठी ४00 कोटी ४0 लाखांपेक्षा अधिक मदत शासनाकडून मिळण्याची शक्यता आहे.