शहरात काेराेना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. संसर्ग वाढत असल्याचे पाहून नागरिकही चाचणीसाठी पुढाकार घेत असल्यामुळे चाचणी केंद्रांवर झुंबड उडत आहे. गर्दीमुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागत असल्याचे समाेर येताच महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी झाेननिहाय काेराेना चाचणी केंद्र सुरू केले. संशयित रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रत्येक चाचणी केंद्रांवर दरराेज ४०० जणांची चाचणी करण्याचे निर्देश आयुक्त निमा अराेरा यांनी दिले आहेत.
दाेन केंद्रांची जागा बदलली!
मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार पूर्व झोनमधील कृषी नगर येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र.२२ येथील चाचणी केंद्र १७ मार्चपासून जठारपेठ येथील फुलपाखरू शाळेत सुरू केले जाणार आहे. उत्तर झोनमधील सिटी कोतवाली जवळील मनपा हिंदी मुलांची शाळा क्र.१ येथील चाचणी केंद्र पुन्हा एकदा किसनीबाई भरतीया रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या ठिकाणचे केंद्र कायम
जुने शहरातील पश्चिम झोन अंतर्गत हरिहरपेठ येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र.१९ व दक्षिण झोन अंतर्गत आदर्श कॉलनी येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्र.१६ येथील चाचणी केंद्र कायम राहतील. दरम्यान, सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत नागरिकांना चाचणी करता येणार आहे. यावेळी गर्दी टाळण्यासाठी चारही चाचणी केंद्रांवर टोकन पध्दतीनुसार चाचणी केली जाईल.
चाचणी केंद्र सुरू करण्याचे आवाहन
चाचणी केंद्रांवर उडणारी झुंबड पाहता नागरिकांना चाचणी साेयीची ठरावी, या उद्देशातून मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी स्थानिक सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांना चाचणी केंद्र उघडण्याची मुभा दिली आहे. यासाठी इच्छुकांनी मनपाच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेसाेबत संपर्क साधून परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.