अकोला: कोविडपासून गर्भवतींच्या संरक्षणासाठी अखेर अकोल्यात गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी ४१ गर्भवतींचे लसीकरण करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा लक्षणीय आहे. या मोहिमेची सुरुवात जिल्हा स्त्री रुग्णालयातून करण्यात आली असून गर्भवतींसाठी कोव्हॅक्सिन लसीचा उपयोग केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाने गर्भवतींच्या लसीकरणास मान्यता दिली होती. त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात झाली होती, मात्र भीतीपोटी अनेक महिलांनी लस घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले. अकोल्यात मात्र गर्भवतींना समुपदेशनानंतर लसीकरणास सुरुवात करण्यात आली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४१ गर्भवतींनी लस घेतल्याने गर्भवतींचा लसीकरणाला मोठा प्रतिसाद दिसून आला. जिल्हा स्त्री रुग्णालयातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वंदना पटोका (वसो), जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लसीकरणापूर्वी समुपदेशन
कोविड लसीकरणासंदर्भात गर्भवतींमध्ये भीतीचे वातावरण आहे. गर्भवतींची ही भीती लक्षात घेता लसीकरणापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी त्यांच्या मनातील शंकांचे निवारण देखील करण्यात आले. तसेच लस घेतल्यानंतर हलका ताप किंवा हात, पाय दुखल्यास काय करावे या विषयी देखील डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. कोरोनापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व देखील येथील डॉक्टरांनी उपस्थित गर्भवतींना पटवून दिले.
न घाबरता लस घ्या
जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर केंद्र आणि राज्य शासनानेही गर्भवतींच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. गर्भवतींसाठीचे लसीकरण हे सुरक्षित असून गर्भवतींनी न घाबरता लस घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ