- संतोष येलकर अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १३९ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत अद्याप जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाला नाही. ‘मार्च एन्डिंग’ तोंडावर असताना, शासनाकडे निधी अडकल्याने मंजूर निधीतील विकास कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीपैकी ९७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधीपैकी ८४ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी विविध यंत्रणांना विकास कामांसाठी वितरित करण्यात आला आहे. मंजूर निधीपैकी ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत अद्याप जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाला नाही. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, विकास कामांसाठी संबंधित यंत्रणांना निधी वितरणाची प्रक्रिया रखडली आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दीड महिन्याचा कालावधी उरला असताना, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शासनाकडून ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणे प्रलंबित असल्याने, निधी केव्हा उपलब्ध होणार आणि उपलब्ध होणाऱ्या निधीतून जिल्ह्यातील विकास कामे मार्च अखेरपर्यंत मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे असे आहे वास्तव!
- -मंजूर निधी : १३९ कोटी ५१ लाख रुपये.
- - प्राप्त निधी : ९७ कोटी ९७ लाख रुपये.
- -वितरित निधी : ८४ कोटी ४९ लाख रुपये.
- -प्रलंबित निधी : ४१ कोटी ८१ लाख रुपये.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अंतर्गत २०१८-१९ या वर्षातील मंजूर निधीपैकी ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी लवकरच शासनाकडून प्राप्त होणार आहे.-ज्ञानेश्वर आंबेकर,जिल्हा नियोजन अधिकारी.