अकोला: विनातिकीट प्रवास करून रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्यांना जरब बसावी या हेतूने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मंगळवार, २५ एप्रिल रोजी अप-डाऊन मार्गावरील ४२ रेल्वे गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबविली. नियमित तपासणी सोबतच राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एका दिवसात विनातिकीट आढळलेल्या ४,१९० प्रवाशांवर कारवाई करत ३३ लाख ३५ हजार ३१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
भुसावळ विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव सेक्शनमध्ये वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ४२ गाड्यांची तपासणी करण्यात आली. नियमित तिकिट तपासणीसोबतच ही विशेष मोहिम राबविण्यात आली. विशेष मोहिमेत १,६१९ विनातिकिट प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून ११ लाख ११ हजार ४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष व नियमित तपासणी मिळून विनातिकिट आढळून आलेल्या ४,१९० प्रवाशांकडून एकूण ३३ लाख ३५ हजार ३१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत दोन वाणिज्य अधिकारी, ८१ तिकीट चेकिंग कर्मचारी व आरपीएफच्या २१ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
रेल्वेत प्रवास करताना योग्य ते तिकीट घेऊन ज्या श्रेणीचे तिकीट आहे त्याच श्रेणीच्या डब्यात प्रवास केला पाहिजे. तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास नको असेल तर प्रवाशांनी यूटीएस ॲपचा वापर करावा. -शिवराज मानसपुरे, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक, भुसावळ