- संतोष येलकर
अकोला : पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने, जिल्ह्यात ४ हजार १९६ लाभार्थींना घरकुलाचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना (ग्रामीण ) अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान शासनामार्फत देण्यात येते; परंतु गत दोन वर्षांच्या कालावधीत घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींपैकी घरकुल बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील ४ हजार १९६ लाभार्थींना अद्याप घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल मंजूर झाल्यानंतर; परंतु स्वत:च्या मालकीची जागा नसलेल्या जिल्ह्यातील संबंधित लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागेचा पुरावा सादर करणे आवश्यक!
घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींनी घरकुल बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा असल्याचा पुरावा संबंधित पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर करणे आवश्यक आहे. जागा असल्याचा पुरावा सादर केल्यानंतरच संबंधित लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी अनुदान मंजूर करण्यात येते.
घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींपैकी घरकुल बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने जिल्ह्यात ४ हजार १९६ लाभार्थीं अद्याप घरकुल लाभापासून वंचित आहेत. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- सूरज गोहाड, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा