अकोला : नवीन वर्षाचा पहिला दिवस हा ‘शौर्य दिवस’ आहे. भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. देशातील पेशवाईचा, जातीयतेचा, विषमतेचा आणि वर्णव्यवस्थेचा या दिवशी अंत झाला होता. यावर्षी त्या घटनेला २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त अकोल्यात ४२ फूट उंचीच्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याची माहिती अॅड़ सी. ए. दंदी व प्रा. एम. आर. इंगळे यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. महार रेजिमेंटच्या शूर पराक्रमाचे प्रतीक असलेल्या पुणे शहराच्या शेजारील भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभ उभा आहे. या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी १ जानेवारी रोजी उपस्थित राहत होते. १८१८ पासून हा स्तंभ दिमाखाने उभा आहे. या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अकोला जिल्ह्यातील जनता काही कारणाने जाऊ शकत नाही, त्यांना अकोल्यात प्रतिकृती उभारून मानवंदना देण्याचे समाधान मिळावे, यासाठी लॉर्ड बुद्धा फाउंडेशन व वंदना संघ आणि संघर्ष युवा फाउंडेशन यांनी अकोल्यात अशोक वाटिका येथे विजयस्तंभाची प्रतिकृती उभी करून या स्तंभाची गरिमा व शूरता दर्शविणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये भन्ते विशालकीर्ती, महादेव तायडे, इरभान तायडे व यशवंत इंगोले यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन डॉ. मेघा तिडके करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद भोजने असतील. त्यावेळी समता सैनिक दल विजयस्तंभाला मानवंदना देतील. त्यानंतर बुद्ध, धम्म, संघ वंदना घेण्यात येईल. प्रेरणा देणारे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले. यावर्षी दिलीप मोहोड, अशोक खंडारे, प्रा. सुरेश मोरे, हरीश काळे, शांताराम पळसपगार, सुरेंद्र तिडके, भीमराव इंगळे, दीपक खंडारे, सुरेंद्र अहीर व युवराज सिरसाट हे विजयस्तंभाला पुष्पचक्र वाहण्याचे मानकरी आहेत. कार्यक्रमाची सांगता गजानन शेगावकर यांचा भीम गीतगायनाच्या कार्यक्रमाने होईल, अशी माहिती यावेळी अॅड़ दंदी यांनी दिली.