लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील विज्ञान महाविद्यालयांमध्ये अकरावीमध्ये प्रवेश मिळालेल्या ४२०० विद्यार्थ्यांची पहिली यादी १० जुलै रोजी जाहीर करण्यात आली. पर्यायामध्ये कमी महाविद्यालये टाकल्याने ५० विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाद झाले आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १४ जुलै दरम्यान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. शहरातील विज्ञान महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज व महाविद्यालयांचे पसंती क्रम मागवण्यात आले होते. या पसंतीक्रम आणि गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. ४२०० विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला आहे. विद्यार्थ्यांची नावे आणि प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय याची यादी शहरातील आर.एल.टी.विज्ञान महाविद्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, श्रीराम विद्यालय, कौलखेड आणि शिवाजी महाविद्यालय आदी केंद्रांवर लावण्यात आली आहे, तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले महाविद्यालय पाहण्याची सोय करून देण्यात आली आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. सीएओ. अकोला. इन या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांना महाविद्यालय पाहता येणार आहे. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ११ ते १४ जुलैपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या व प्रवेश प्रक्रियेतून बाद झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी १२ जुलैपासून नव्याने आवेदन सादर करावे लागणार असून, त्यामध्येही महाविद्यालयांचे पसंती क्रमांक द्यावे लागणार आहे. त्यानंतर उपलब्ध महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
४२०० विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश; ५० विद्यार्थी झाले बाद!
By admin | Published: July 11, 2017 1:17 AM