अकोला: माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत शहरातील दोन लाख ४२ हजार ४६१ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेले ६१ रुग्ण आढळून आले असून, तब्बल ४,२७५ रुग्ण रक्तदाब व मधुमेहाचे आढळून आल्याचे महापालिकेच्या अहवालावरून समोर आले.महापालिकेतर्फे शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी, अभियान हाती घेण्यात आले असून, या अंतर्गत घरोघरी जाऊन प्रत्येकाचे तापमान व आॅक्सिजन पातळी तपासली जात आहे. अभियानासाठी महापालिकेतर्फे १५० पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकांनी आतापर्यंत ७२,३५१ घरांना भेटी देऊन तपासणी केली आहे. आरोग्य पथकांच्या अहवालानुसार, शहरातील तब्बल दोन लाख४२ हजार ४६१ नागरिकांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीतून केवळ ६१ नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, तर ५५ नागरिकांना कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात आले आहे. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे हा या अभियानामागील हेतू आहे; परंतु अभियानातून कोरोनाबाधित रुग्ण अत्यल्प आढळून आले, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, दररोज कोरोनाचे सरासरी शंभर रुग्ण आढळून येत आहेत; मात्र अभियानांतर्गत कोरोना बाधितांची संख्या कमी आढळून येत असून, सर्वाधिक रुग्ण हे रक्तदाब व मधुमेहाचे सापडले आहेत.अशी आहे आकडेवारीएकूण नागरिकांची तपासणी - २,४२,४६१रक्तदाब, मधुमेहासारखा दुर्धर आजार - ४,२७५लक्षणे असलेले रुग्ण - ६१कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित - ५५अॅपमध्ये माहिती अद्ययावत - १७,८९८रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांवर लक्षकोरोना विषाणूचे ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणारे व रक्तदाब, मधुमेह अशा आजारांच्या रुग्णांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना आरोग्य पथकाच्या निगराणीखाली ठेवणे, या अभियानामुळे शक्य होणार असल्याचेही महापालिका आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत दोन लाखापेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये रक्तदाब, मधुमेहासारखा दुर्धर आजार असणारे ४,२७५ रुग्ण आढळले. या रुग्णांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष देणार आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात.- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला.
अकोला शहरात आढळले मधुमेह, उच्चरक्तदाबाचे ४२७५ रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:33 AM