अकोटःअकोट ग्रामीण पोलीसांनी महाशिवरात्री आँपरेशन यशस्वीपणे राबवित कत्तलीकरीता जंगल मार्गाने आणल्या जात असलेले ४५ गोवंश जप्तीची धाडसी कारवाई २१ फेब्रुवारी रोजी केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलांना जीवदान मिळाल्याने गोवंशप्रेमीत समाधान होत आहे. मध्यप्रदेशातुन पायदळ आकोटकडे गोवंश कत्तलीकरीता आणल्या जात असल्याची माहीती ग्रामीण पोलीस स्टेशनला ठाणेदार ज्ञानोबा फड यांना मिळाली. माहीतीची पडताळणी करीता अकोट नजीक खुंदानपुर परिसरातील जंगलात सापळा रचला. यावेळी काही इसम हे गोवंशाचे जथ्था घेऊन येत असल्याचे दृष्टीस पडले. तात्काळ पोलीस स्टेशनमधील पोलीस ताफा बोलावून ४५ गोवंश पकडले. यावेळी घटनास्थळावर एकदमच पोलीस दाखल झाल्याचे पाहुन आरोपी जंगलात पळुन गेले. त्यामुळे स्थानिक युवकांच्या सहकार्याने सर्व गोवंश रस्त्याने सुरक्षित आणत गोरक्षण समितीच्या ताब्यात देण्यात आले. ग्रामीण पोलीसांनी जप्त केलेल्या ४५ गोवंशाची किंमत बाजारपेठत ३ लाख८१ हजार रूपये असुन या प्रकरणी ४-५ अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असुन पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे, पोहेकाॅ नारायण वाडेकर, गजानन भगत, नंदकिशोर कुलट, वामन मिसाळ,अनिल सिरसाट, नंदकिशोर कुलट, प्रविण गवळी, चालक मोतीराम गोडचर, रामेश्वर भगत, विजय साबळे व आर सी पी पथक यांनी केली. चौकट.... या मार्गाने होते गोवंशाची तस्करीः ग्रामीण पोलीसांचे महाशिवरात्री आँपरेशन अकोट लगत असलेल्या सातपुडा जंगल पलीकडे मध्यप्रदेशाची सिमा आहे. कत्तलीकरीता गोवंशाची तस्करांना या जंगलातील मार्ग सोयीचे ठरत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. जंगलातील अतिसंरक्षित भागातून वाहनाद्वारे जनावरे आणले जातात. त्यानंतर वाहनातून खाली उतरून या जनावरांचा जथ्था पायदळ अतिदुर्गम मार्गाने पोपटखेड धरणावरून आबोडा अकोलखेड मार्गे खुदानपुर परीसरात दाखल होताच ही कारवाई केल्याची माहीती पुढे येत आहे. वनविभागाचा बहुतांश भाग हा व्याघ्र प्रकल्पाचे हद्दीत येतो. या भागातुन गोवंश येत असतील तर कारवाईचा पेच निर्माण होता. शिवाय गोवंश तस्करी करणार्यांचे सहकारी पायदळ गोवंश आणत असतांना दुचाकीने पुढे येऊन रस्त्याची टेहाळणी करता रस्त्यावर पोलीस किंवा कोणीच नसल्याने पाहून नियोजित मार्गाने हे गोवंश कत्तली करीता सुरक्षितस्थळी पोहोचवले जातात. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी अकोट ग्रामीण चे ठाणेदार ज्ञानोबा फड आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह पहाटेपासूनच गोवंश येत असलेल्या मार्गावर दबा धरून बसले होते. जनावराचा जथ्था दिसतात त्यांनी अचानक तुटून पडत कारवाई केल्याचे समजते.
कत्तलीसाठी नेत असलेल्या ४५ गोवंशास जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 3:56 PM