अकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, त्यापैकी १८ मेपर्यंत जिल्ह्यात ५० हजार २८५ शेतकऱ्यांना ४५६ कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असताना उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यातील ९२ हजार २१५ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने गत १ एप्रिलपासून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत १८ मेपर्यंत जिल्ह्यात ५० हजार २८५ शेतकऱ्यांना ४५६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला असून, खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असताना, जिल्ह्यातील ९२ हजार २१५ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू आहे. १८ मेपर्यंत जिल्ह्यातील ५० हजार २८५ शेतकऱ्यांना ४५६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले आहे.
-आलोक तारेणिया
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.