अकोला : जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, पशुपालकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या २० दिवसांमध्ये लम्पीमुळे जिल्ह्यात तब्बल ४६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १,४७६ पशूंना लागण झाली असून, त्यापैकी १००१ पशूंवर सद्य:स्थितीत उपचार सुरू आहेत. लम्पीला रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाला वेग दिला जात आहे. दि. १९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ८७ हजार ५८४ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
लम्पी या चर्मरोगाने जिल्हाभरात हात-पाय पसरले आहेत. सातही तालुक्यांत लम्पीचा झपाट्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात लम्पीचा एकूण आकडा दीड हजाराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. तसेच लम्पीमुळे ४६ गुरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात लम्पीमुळे ४७ हजार २६४ पशुधन धोक्यात आले आहे. लम्पी रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची तोकड्या कर्मचाऱ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरांमध्ये लम्पीचे लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तब्बल ३४३ गावे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असून, तेथे पशूंची विक्री-खरेदी, वाहतूक बंद करण्यात आली आहे.
५५५ गायी, ९१९ बैलांना लागणजिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय शेती असून, शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करतो. जिल्ह्यात तब्बल गायवर्ग व म्हैसवर्ग असलेले २ लाख ८२ हजार ९६८ एवढे एकूण पशुधन आहे. त्यापैकी ५५५ गायी व ९१९ बैलांना लम्पीची लागण झाली आहे.