अकोला: शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सोमवारपासून नियमांचे पालन करीत, इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी केवळ १० टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये दिसून आली. जिल्ह्यातील ५३८ शाळांपैकी सोमवारी ४६२ उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारी शाळांमध्ये ६ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर ४,२०० पैकी ३ हजार ५२९ शिक्षकांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शाळा सुरू करण्याविषयी संभ्रमाची स्थिती होती; परंतु शासनाने परवानगी दिल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थी व शिक्षक थर्मल स्कॅनिंग करण्यासोबतच इतर सुविधा उपलब्ध करण्यास बजावले होते. त्यानुसार सोमवारी विद्यार्थी व शिक्षकांची तपासणी करून शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळांमध्ये सध्या महत्त्वाचे इंग्रजी, गणित व विज्ञान विषयाच्या तासिका घेण्यात येणार आहेत. उर्वरित विषयाच्या तासिका ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत शिक्षण विभागाने पालकांकडून शाळेमार्फत संममिपत्र मागविले होते; परंतु १ लाख ६ हजार १९९ विद्यार्थ्यांपैकी केवळ १० हजार ५१ पालकांनीच संमतिपत्र भरून दिल्याची माहिती आहे. कोरोनाची प्रादुर्भाव संपला नाही. दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असताना, पालक मुलांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक संभ्रमात आहेत. त्यामुळेच सोमवारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती दिसून आली.
शाळा ४६२
उपस्थित शिक्षक ३,५२९
उपस्थित विद्यार्थी ६,९५६