अकाेला : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत १ हजार ९६० जागांसाठी एकूण ४ हजार ७२७ अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आले आहेत. समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.
शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत ३० मार्च राेजीच संपली असून हा कायदा शाळांचा प्रवेश टप्पा जेथून सुरू होतो त्या पहिल्या वर्गापासून राबवला जाताे. जिल्ह्यातील २०२ शाळांची नाेंदणी झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता छाननी व साेडतीकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
दाेन वेळा वाढविली मुदत
आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली हाेती. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २१ मार्चपर्यंत निश्चित केली होती. मात्र पालकांना ओटीपी मिळण्यास तांत्रिक खोडा निर्माण झाल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ही मुदत ३० मार्चपर्यंत वाढविण्यात आली हाेती.
अशी आहे जिल्ह्याची स्थिती
- नोंदणी केलेल्या शाळा - २०२
- आरक्षित जागा - १ हजार ९६०
- अर्ज - ४ हजार ७२७