संतोषकुमार गवई
पातूर : बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख ९४ हजार ८३२ मतदार आहेत. त्यापैकी ५,१४७ मतदारांपैकी ३८८ मतदारांचे फोटो मिळवण्यात निवडणूक विभागाला यश आले आहे; मात्र ४,७५९ मतदार पत्त्यावर राहत नसल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी ही शंभर टक्के छायाचित्रयुक्त बनल्याची माहिती बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी ‘लोकमत’ला दिली.
मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या निवासी पत्त्यावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असता, मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आलेले नाहीत. जे मतदार निवासी पत्त्यावर राहत नाहीत, त्यांना उपविभागीय मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बाळापूर डॉ. रामेश्वर पुरी यांनी दि. २६ जून रोजी एका पत्रकाद्वारे १५ जुलैपर्यंत फोटो किंवा काही आक्षेप असल्यास तहसील कार्यालय बाळापूर किंवा पातूरमध्ये देण्याबाबत सूचित केले होते. बाळापूर मतदारसंघातील ५,१४७ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये नव्हते. त्यापैकी ३८८ मतदारांचे छायाचित्र प्राप्त झाले असून, ४,७५९ मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आली आहेत.
----------------------
यादी १०० टक्के छायाचित्रयुक्त करण्यासाठी यांनी घेतले परिश्रम...
बाळापूर मतदारसंघाची मतदार यादी १०० टक्के छायाचित्रयुक्त करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बाळापूर डॉ. रामेश्वर पुरी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, बाळापूर डी. एल. मुकुंदे, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, पातूर दीपक बाजड, नायब तहसीलदार अतुल सोनोने, विजय खेडकर, तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याची माहिती दीपक पाटील, भूषण बोर्डे यांनी दिली.