अकोला: राज्यात अल्पसंख्यांक समाजातील उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाºया व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वाव मिळावा, या उद्देशातून शासनाने शिष्यवृत्तीसाठी ४९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीमुळे संबंधित विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील होतकरू व मेहनती विद्यार्थ्यांसाठी शासनाने अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून विविध योजना अमलात आणल्या आहेत. उच्च व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा उद्देश आहे. या पृष्ठभूमिवर पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. तंत्र शिक्षण संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय तसेच उच्च शिक्षण संचालनालयाच्यावतीने शिष्यवृत्तीसाठी पात्र अर्जांचा विचार करून राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडे निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्राप्त अर्ज व प्रस्ताव ध्यानात घेता १३ फेब्रुवारी रोजी शासनाने वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून संबंधित तीनही विभागांकरिता ४९ कोटी ९९ लाख रुपये निधी मंजूर केला.शिष्यवृत्तीसाठी २६ हजार २०० अर्जशिष्यवृत्तीसाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडे २० हजार ७६३ अर्ज प्राप्त असून, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयकडे ४ हजार ४०१ तसेच उच्च शिक्षण संचालनालयाकडे १ हजार ३६ असे एकूण २६ हजार २०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने शासनाने प्रत्येकी ३७ कोटी ५२ लाख ४० हजार रुपये, १२ कोटी १८ लाख व २८ लाख ५९ हजार ५१७ रुपये मंजूर केले.