अकोला : मानव विकास मिशन अंतर्गत पातूर तालुक्यातील ३९ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ लाख रुपयांचा निधी गतवर्षी मंजूर केला होता. वर्ष उलटून आणि नवीन शैक्षणिक सत्रास सुरुवात झाल्यानंतरही ४९६ विद्यार्थिनींना सायकली मिळाल्या नाहीत. यासंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीतसुद्धा चर्चा झाली. प्रशासनाने शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अहवाल मागविला आहे.राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या तालुक्यांसाठी मानव विकास योजना कार्यक्रम राबविण्यात येतो. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील ३९ शाळांची योजनेसाठी निवड झाली आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अनुदान उपलब्ध करून दिले होते. २0१७ व १८ या वर्षासाठी शासनाकडून पातूर तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावीत शिकणाºया ४९६ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात येणार होते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि घरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या शाळेमध्ये जाता यावे, यासाठी मोफत सायकली उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. त्यासाठी प्रशासनाने माध्यमिक शिक्षण विभागाला १५ लाख रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला; परंतु या निधीतून शिक्षण विभागाने सायकलीही खरेदी केल्या नाहीत आणि विद्यार्थिनींना त्या उपलब्धही करून दिल्या नाहीत. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ४९६ विद्यार्थिनी सायकलीपासून वंचित असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. विद्यार्थिनींना सायकली मिळाल्या नाहीत. ही गंभीर बाब असून, शिक्षण विभागाने त्यांना तातडीने सायकली उपलब्ध करून देण्यास बजावले आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाने याबाबतच अहवाल पाठविण्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)मानव विकास मिशन अंतर्गत ४९६ विद्यार्थिनींच्या सायकलींसाठी निधी पातूर गटविकास अधिकाºयांकडे वळता केला. त्यांनी निधीतून सायकली खरेदी करून त्यांचे वाटप करणे अपेक्षित होते. त्यांनी विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून दिल्या नाहीत, याची आम्ही चौकशी करून अहवाल सादर करू.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.