अकोला : कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याचे पाहून महापालिका प्रशासनाने परदेशातून तसेच मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसह परराज्यातून दाखल झालेल्या नागरिकांचा शोध घेतला असता परदेशातून १२२ तसेच परराज्य व इतर मोठ्या शहरांमधून तब्बल ५१४० नागरिक आढळून आले आहेत. संबंधितांची नोंद मनपाच्या दप्तरी घेण्यात आली आहे.देशात कोरोना विषाणूच्या प्रसाराला सुरुवात होताच शहरामध्ये परदेशातील तसेच परराज्य व मोठ्या शहरांमधील नागरिक दाखल झाले. बाहेरगावातून आलेल्या नागरिकांबद्दल महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याचा ऊहापोह होताच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बाहेरगावच्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना ‘होम क्वारंटीन’ करण्याचे मनपाला निर्देश दिले. त्या पृष्ठभूमीवर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरातील संपूर्ण मालमत्ताधारकांचा सर्व्हे करून बाहेरगावच्या व्यक्तींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. सहायक आयुक्त पूनम कळंबे यांच्या मार्गदर्शनात गठित केलेल्या ४८ पथकांमधील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांनी शहरातील संपूर्ण मालमत्तांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. यादरम्यान, मनपा क्षेत्रामध्ये परदेशातून १२२ तसेच परराज्य व मोठ्या शहरांमधून ५१४० नागरिक दाखल झाल्याचे आढळून आले आहे. संबंधित नागरिकांना खबरदारी म्हणून ‘होम क्वारंटीन’ होण्याचे निर्देश मनपाने दिले असून, त्यांच्यावर मनपाची यंत्रणा लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.
परदेशातील नागरिकांवर विशेष लक्षपरदेशातून शहरात दाखल झालेल्या १२२ नागरिकांवर मनपाचे विशेष लक्ष आहे. यापैकी बहुतेकांचा ‘होम क्वारंटीन’चा कालावधी पूर्ण झाला असून, त्यांच्यामध्ये तूर्तास तरी कोरोनासंदर्भात कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती आहे.