लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत रेल्वे स्टेशन परिसरात अग्रवाल ट्रेडर्स येथून खुलेआम गुटखा विक्री सुरू असताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून सुमारे पाच लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला.मूर्तिजापूर शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवणूक करण्यात येत असून, येथून गुटख्याची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यात येत आहे. याकडे मूर्तिजापूर शहर पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने गुटख्याची खुलेआम विक्री आणि वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी स्टेशन परिसरातील गजानन अग्रवाल आणि गणेश अग्रवाल या दोघांच्या मालकीच्या अग्रवाल ट्रेडर्समधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू विक्री करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह सायंकाळच्या सुमारास छापा टाकला, यावेळी विमल, नजर, काली बहार, पान बहार यासारख्या गुटख्याचा मोठा साठा होता. हा साठा विशेष पथकाने जप्त केला असून, तो अन्न व औषध प्रशासनाकडे सादर केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत हा गुटखा ताब्यात घेतला नव्हता. गुटखा माफिया गणेश अग्रवाल आणि गजानन अग्रवाल या दोघांना विशेष पथकाद्वारे समजपत्र देण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येणार आहे.--
पाच लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: May 20, 2017 1:31 AM