अकोला : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन दिली होती. ही डेडलाइन उलटूनही दोन दिवस झाले तरी, जिल्ह्यातील ५ टक्के शिक्षकांनी अद्यापही लस घेतली नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने प्रथम इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. काही अपवाद वगळता, ९९ टक्के शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे; परंतु अद्यापही शेकडो शिक्षकांनी कोरोना लसीकरण करून घेतले नाही. लसीकरणाबाबत शिक्षकांच्या मनातही काही गैरसमज पसरलेले असल्यामुळे अनेकांनी कोरोनाची लस घेतली नाही. काहींनी वेळकाढू धोरण स्वीकारले आहे. राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोज घेण्याची सक्ती केली असतानाही शिक्षक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एक लस घेतली आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण शिक्षक- १७९३०
पहिला डोस- १५९६२
दुसरा डोस-१५९६२
दोन्ही डोस न घेतलेले-१९६८
शासकीय शाळांतील शिक्षक- ४९६२
खाजगी शाळांतील शिक्षक- १२४६८
एकूण शिक्षकेतर कर्मचारी- ४४०९
शासकीय शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी- ११६३
खाजगी शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी- ३२४६
लस घेतलेले कर्मचारी- ३९०४
दोन्ही डोस न घेतलेले- ५०५
शासनाने ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना लस घेणे बंधनकारक केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ९५ टक्के शिक्षक, कर्मचाऱ्यांनी दोन्ही लस घेतली आहे. केवळ ५ टक्के शिक्षक, कर्मचाऱ्यांनी एक लस घेतली. दुसऱ्या लसीसाठी प्रतीक्षा आहे. त्यांचेसुद्धा लसीकरण लवकरच पूर्ण होईल.
-दिलीप तायडे, प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक