अकोला : सिमेंट काँक्रिटचे वाढत असलेले जंगल आणि वृक्षांची बेसुमार होत असलेल्या कत्तलीमुळे वातावरणाचे संतुलन बिघडत आहे. वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप थांबता थांबत नाहीये. उन्हाचा वाढता प्रकोप, पावसाची कमतरता यामुळे वातावरण सातत्याने बदलत आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होत आहेत. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जिल्ह्याचे रान आणि रस्ते हिरवेगार आणि वृक्षवल्ली करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात एकेकाळी ७० टक्के जंगल होते; परंतु सातत्याने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र ३० टक्क्यांवर आले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेले वृक्षसुद्धा तोडली जात आहेत. त्याचा परिणाम वातावरणावर होत असून, जिल्ह्याच्या तापमानात वर्षोगणिक वाढ होत आहे. वाढत्या वातावरणावर मात करण्यासाठी आणि निसर्गाचे ढासळते संतुलन कायम राखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा शासनानेसुद्धा प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यासाठी वन विभागाला प्रोत्साहन दिले आहे. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांमध्ये ५० कोटी वृक्षांची लागवड झालीच पाहिजे. या उद्देशाने वन विभाग कामाला लागला आहे. वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीसंदर्भात जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून कोणत्या ठिकाणी, कोणत्या रस्त्यावर वृक्ष लागवडीसाठी किती जागा उपलब्ध आहे, जागा उपलब्ध नसल्यास ती उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. ५० कोटी वृक्ष लागवड करून राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त करण्याचा वन विभागाचा मानस असून, यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण, सामाजिक, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. अकोला जिल्हा हिरवेगार करण्याचा संकल्प वन विभागासह सामाजिक वनीकरण विभागाने केला आहे. तालुकानिहाय वृक्ष लागवडीचे लक्ष्य५० कोटी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात वन विभागाने नियोजन केले असून, तालुकानिहाय वृक्ष लागवडीवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात येणार आहे.
५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य!
By admin | Published: April 19, 2017 1:47 AM