ऑनलाइन लोकमत
गांधीग्राम (अकोला), दि. 15 - येथील पूर्णा नदीच्या काठावरील एका मंदिराजवळ भंडारा सुरू होता. तेथे जवळ असलेल्या झाडावरील गांधीलमाशांचे मोहोळ उठले. त्यातील मधमाशा जेवण करणारे पुरुष, महिला व मुले अशा ५० जणांना चावल्याने ते जखमी झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी घडली.
पूर्णा नदीच्या काठावर सतेश्वर महाराजांचे मंदिर आहे. या मंदिराजवळ वड व पिंपळाचे दोन मोठे वृक्ष असून, गांधीलमाशांचे सात आग्यामोहोळ लागलेले आहेत. या ठिकाणी चांदूर येथील माहोरे परिवाराचा भंडाºयाचा कार्यक्रम रविवारी दुपारी सुरू होता. या भंडाºयाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यात पुरुष, महिला व मुलांचा समावेश होता. हे भंडाºयाचे जेवण सुरू असताना अचानक तेथील वृक्षांवरील आग्यामोहोळ उठले. त्यामधील गांधीलमाशांनी पंगतीमध्ये जेवणास बसलेल्या लोकांवर जोरदार हल्ला केला. त्यामुळे जेवण करणाºया लोकांची पळापळ सुरू झाली. लोक मिळेल त्या रस्त्याने पळत सुटले. मधमाशांच्या या हल्ल्यात पुरुष, महिला व मुले असे एकूण ५० जण जबर जखमी झाले. यावेळी जागरूक ग्रामस्थांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. सदर रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यासाठी पाठविण्यात आले. या जखमींना रुग्णवाहिकेपर्यंत उचलून नेण्यासाठी दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वनारे, पोलीस जमादार राठोड, वाहनचालक ठाकरे व गांधीग्रामच्या युवकांनी मोलाची मदत केली. (वार्ताहर)