अकोला - निमकर्दा-उरळ मार्गावरून बेकायदेशीर वाहतूक होत असलेला गुटखा साठा बुधवारी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला. या ट्रकमध्ये सुमारे ५0 लाख रुपयांचा गुटखासाठा सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. उरळ-निमकर्दा रोडवर एमएच ४१ जी ६३२३ क्रमांकाच्या ट्रकमधून ट्रकचालक मो. आमीन शेख इर्शाद हा प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीररीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व त्यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमुख सचिन जाधव व कर्मचारी या मार्गावर मंगळवारी रात्रीपासून ट्रकच्या पाळतीवर होते. बुधवारी पहाटे गुटख्या भरलेला ट्रक दिसून आला. पथकाने ट्रकचा पाठलाग करून ट्रक जप्त केला. ट्रकमध्ये असलेल्या गुटख्याची तपासणी केली असता ४८ लाख ५0 हजार रुपयांचा माल आढळून आला. ट्रकसह या गुटख्याची किंमत ६0 लाख रुपयांची असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जप्त करण्यात आलेला गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात ट्रकचालक व गुटखा माफियांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी यापूर्वीही याच परिसरातून ४0 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या कारवाईनंतरही या परिसरात गुटखा माफियांकडून अवैध मार्गाने प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक व साठा होत असल्याचे बुधवारच्या कारवाईतून स्पष्ट झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पथकाचे प्रमुख सचिन जाधव व त्यांच्या कर्मचार्यांनी केली.
५0 लाखांचा गुटखा साठा जप्त
By admin | Published: October 08, 2015 1:47 AM