अकोला : एसटी महामंडळानेही आधुनिकतेकडे वळत तिकीट काढण्यासाठी ईटीआयएम मशीनचा वापर सुरू केला आहे; परंतु या मशीनमध्ये नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. ५० टक्के ईटीआयएम मशीन भंगार झाल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ईटीएम आता कालबाह्य झाल्या आहेत. असे असतानाही त्या वापरण्याची सक्ती वाहकांना करण्यात येत आहे. या मशिन्स अचानक बंद पडणे, त्यांचे चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकीट अर्धवट निघणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहक त्रस्तही झाले असून, अनेक वाहकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील पाच आगारात ४९४ ईटीआयएम मशीन पुरविण्यात आल्या आहेत. यापैकी १७५ मशीन नादुरुस्त आहे तर १९९ मशीन वापरात आहे.
आगार क्रमांक २ मधील एसटी बसेस- ५२
सध्या सुरू असलेल्या बसेस - ३०
तिकिटे काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन- ४९४
सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन- १७५
काय म्हणतेय आकडेवारी
आगार इलेक्ट्राॅनिक मशीन बिघाड वापरात
अकोला १ १०२ ३० ५०
अकोला २ १५९ ३६ ६३
अकोट १०५ ४८ ४१
तेल्हारा ७५ ३७ ३१
मूर्तिजापूर ५३ २४ १४
दुष्काळात तेरावा महिना
कोरोनाकाळात एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. रातराणी बसफेऱ्या बंद असून, ग्रामीण भागातील फेऱ्यांची संख्याही घटली आहे. परिणामी, एसटीच्या उत्पन्नात ३० टक्के घट आली आहे. अशात मालवाहतुकीचा एसटी महामंडळाला मोठा आधार होत असल्याचे दिसते.
वाहकांकडून आकड्यांची जुळवाजुळव
जुन्या मशीनचे प्रशिक्षण साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी देण्यात आलेले आहे. तसे प्रमाणपत्रही त्यांच्याकडून घेण्यात आले; परंतु इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे जुन्या ट्रे वापराचा विसर पडला आहे. प्रशिक्षण नसल्याने चुकीचे तिकीट जाण्यासह कारवाईही अंगलट येण्याची भीती व्यक्त होत असून, वाहकांना आता किती तिकिटे गेली, त्याचे पैसे किती याचा हिशेब करण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
पगार मिळतोय हेच नशीब
बससेवा सुरू झाली असली तरी ग्रामीण भागातील बस अजूनही बंद आहे. लांब पल्ल्याच्या बस अधिक सुरू झाल्या आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांची ड्यूटी लागत असून, जितके दिवस ड्यूटी तितक्याच दिवसांचा पगार दिला जातो. काही कर्मचाऱ्यांना अजूनही ड्यूटीची प्रतीक्षा आहे.